शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कणकवली कोर्टाकडून पोलीस कोठडीचा निर्णय घेतला . दरम्यान या प्रकरणात आज फार मोठ्या घडामोडी घडल्या, नितेश राणे यांना जामीन अर्ज मागे घेण्यापासून ते 4 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावल्या पर्यत…या सर्व घडामोडीचा संपुर्ण घटनाक्रम पाहूयात…
जामीन फेटाळला
संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा जामीन मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला होता आणि नितेश राणे यांना 10 दिवसांत शरण येण्याची मुदत देण्यात आली होती.त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नितेश राणे हे 28 जानेवारीला न्यायालयासमोर हजर झाले.
जामीन अर्ज मागे
भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र नितेश राणे यांनी हायकोर्टातील अर्ज मागे घेतला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीन मानेशिंदे यांनी दिली आहे.
"मी सरेंडर होण्यासाठी जातोय"
"काल सेशन कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, त्या निकालाचा आदर ठेवून मी आता सरेंडर होण्यासाठी जातोय. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला. पण मी आज स्वत:हून, कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वत: सरेंडर होण्यासाठी जात आहे." असं नितेश राणे यांनी माध्यमांना सांगितलं.
सिंधुदुर्ग न्यायालयात शरण
नितेश राणे हे सिंधुदुर्ग सत्र न्यायलयात शरण आले आहेत. नितेश राणे यांचे वकील जामिनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करत आहेत.
नितेश राणे यांचं सूचक ट्वीट, अमित शहांचा उल्लेख…
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. तसेच, ते आता न्यायालयासमोर शरण देखील होत आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. शिवाय, नितेश राणे यांनी एक सूचक ट्वीट देखील केलं आहे. यामध्ये त्यांनी समय बडा बलवान है.. असं म्हटलं आहे.
भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा
जिल्हाधिकारी यांचा जमाव बंदी आदेशाचा भंग करणे आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांवर ओरोस सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जिल्हा न्यायालयाबाहेर माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचाही भंग केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दंगल नियंत्रण पथक तैनात
दिवाणी न्यायालय कणकवली कोर्टाबाहेर दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर काहीही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे
पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली
नितेश राणे यांचे वकील जामिनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करत आहेत. परंतु, सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही? याबाबत अद्याप गोंधळ कायम आहे.
नितेश राणेंना दोन दिवस पोलीस कोठडी
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे कणकवली न्यायालयामध्ये शरण आले त्यानंतर युक्तिवाद झाला. न्यायालयाने येत्या दि.४ फेब्रुवारी पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
प्रकरण काय ?
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेतलं. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती.
"दुचाकीवर असताना मला जोरात एका गाडीने धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की त्यामुळे मी रस्त्याच्या बाजूने फरफटत गेलो. माझ्या हाताला जखमही झाली आहे. फरफटत जाऊन मी एका बाजूला पडलो होतो आणि माझी दुचाकी माझ्या पायावर होती. ती एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा होती. पुढे जाऊन २०-२५ फुटांवर जाऊन थांबली. त्यातील एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि जाताना गोट्या सावंत, नितेश राणे यांना कळवलं पाहिजे असं म्हणत खिशातून मोबाईल काढला," असं संतोष परब यांनी सांगितलं होतं.