नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेस टिकैत यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. आम्ही पिकांची कापणीही करू आणि आंदोलनही करू, असे त्यांनी सरकारला सुनावले.
आंदोलक शेतकऱ्यांनी देशव्यापी रेल रोको आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर हरियाणातील हिसार जिल्ह्यात किसान महापंचायतमध्ये राकेश टिकैत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. दोन महिन्यांत पिकांच्या कापणीला सुरुवात होईल आणि शेतकरी गावाला परततील असे सरकारला वाटते. पण आम्ही कापणीही करू आणि त्याचबरोबर आंदोलनही करू. आमच्यावर दबाव टाकला तर, उभ्या पिकाला आम्ही आग लावू, असा इशाराही त्यांनी दिला.
हरियाणातून आपल्याला भरपूर समर्थन मिळत आहे. ही पंचायत केवळ हरियाणा पूरतीच मर्यादित नाही, तर आम्ही प्रत्येक राज्यात जाऊन पंचायत करू, असे सांगून ते म्हणाले, आता आमचे पुढील लक्ष्य 40 लाख ट्रॅक्टर्सचे आहे. देशभरात जाऊन आम्ही 40 लाख ट्रॅक्टर्स जमा करू. जास्त अडचणी निर्माण केल्या तर, हे ट्रॅक्टरही आहेत आणि शेतकरीही आहेत. ते सर्व दिल्लीला जातील. यावेळी 'नांगर क्रांती' होईल. शेतात वापरली जाणारी अवजारे ते घेऊन जाऊ, असे ते म्हणाले.
सरकार शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे. जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत शेतकरी माघारी जाणार नाहीत. तसेच किमान आधारभूत किमतीसाठी (एमएसपी) कायदा आणण्याची देखील आमची मागणी आहे, असे टिकैत यांनी सांगितले.