अमेरिकन प्रसारमाध्यमांना व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांचे काही ईमेल्स सापडले असून त्यामधून बरीच धक्कादायक माहिती समोर आलीय. या ईमेल्समधून असं दिसून येत आहे की करोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळामध्ये डॉ. फौची हे चिनी वैज्ञानिकांच्या संपर्कामध्ये होते. डॉ. फौची डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळापासून आतापर्यंत अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे प्रमुख आरोग्य सल्लागार होते. असं असतानाच डॉ. फौची चीनच्या संपर्कात असल्याने अनेक नवीन प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
त्या वक्तव्याबद्दल मागितली माफी
अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टने ८६६ पानांचा मजकूर असाणारा ईमेल संवाद समोर आणलाय. हा ईमेल २८ मार्च २०२० रोजी चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रव्हेंशनचे निर्देशक जॉर्ज गाओ यांनी डॉ. फौची यांना पाठवला होता. या ईमेलमध्ये गाओ यांनी अमेरिकेतील लोकांना मास्क घालण्यावरुन केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. अमेरिकेमध्ये मास्क न घालण्यासंदर्भात दिलेली सूट ही मोठी चूक असल्याची टीका गाओ यांनी केली होती.