दिल्ली पोलिसाच्या विशेष पथकाने मुंबईचा रहिवासी असलेल्या जान मोहम्मद शेखसह एकूण ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांच्या चौकशीमधून अनेक नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. एक मोठा घातपात घडवून आणण्याचं या दहशतवाद्यांचं नियोजन होतं, असं सांगितलं जात होतं. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक या ६ दहशतवाद्यांची चौकशी करत असून त्यातून आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या दहशतवाद्यांना सर्व विस्फोटकांचा वापर करून पुन्हा एकदा मुंबईवरील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांप्रमाणेच स्फोट घडवून आणायचे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या अटकेमुळे एक मोठी दुर्घटना टळल्याचं स्पष्ट झालं आहे.
दिल्ली पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणात जान मोहम्मद अली शेख उर्फ समीर (वय ४७), उस्मान (वय २२), मूलचंद (वय ४७), झिशान कामर (वय २८), मोहम्मद अबू बकर (वय २३) आणि मोहम्मद आमिर जावेद (वय ३१) अशा सहा जणांनाअटक केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये छापे टाकून यांना अटक करण्यात आली. त्यापैकी जान मोहम्मद अली शेख हा मुंबईच्या धारावीमध्ये वास्तव्यास होता. तो मुंबई सेंट्रलवरून दिल्लीसाठी ट्रेनमधून रवाना झाला असता त्याला कोटा येथून अटक करण्यात आली आहे.