चीनच्या वुहानमधून जगभर पोहचलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चीनमधील नानजिंग शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. सोमवारी ७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जानेवारीनंतर नोंद झालेली सर्वाधिक संख्या असल्यामुळे आरोग्य विभागाने या भागात चाचण्या करण्यावर भर दिला आहे.
मागच्या आठवड्यात नानजिंग विमानतळावर १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर नानजिंक लोकोउ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ५२१ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तसेच व्यापक स्वरुपात कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कोरोनाचा धोका पाहता हजारो लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी केली जात असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. कोरोनाबाधित आढळल्यामुळे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे.