भारतात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळं इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत चालली आहे. दरम्यान, आता काही कंपन्या सोलार एनर्जीवर चालणाऱ्या गाड्यांवर काम करू लागल्या आहेत. पण अद्याप सोलार गाड्या विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या नाहीत. आता नेदरलँडस्थित कंपनीने जगातली पहिली सोलार इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. या कारचं नाव LightYear 0 असं आहे.
ही एक सोलार इलेक्ट्रिक कार आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर तब्बल ७०० किलोमीटरपर्यंत धावते. ही कार सध्या यूएईमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर या कारची किंमत २,५०,००० युरो म्हणजेच तब्बल २ कोटी रुपये इतकी ठेवली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील खरेदीदार ही कार कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बूक करू शकतात. हे वाहन २०२३ च्या सुरुवातीला विक्रीसाठी बाजारात दाखल होईल.
रिपोर्ट्सनुसार ही कार Tesla Model S पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे Lightyear 0 कार उन्हाळ्याच्या हंगामात अनेक महिने चार्ज न करता वापरली जाऊ शकते. तिचं टॉप स्पीड 160 किमी प्रतितास आहे आणि ही सोलर इलेक्ट्रिक कार केवळ 10 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग घेण्यास सक्षम आहे.