केंद्र सरकाने सोशल मीडिया नियमांमध्ये बदल केल्या नंतर गुगल आणि फेसबुकसारख्या डिजीटल कंपन्यांनी भारताच्या नव्या सोशल मीडिया नियमांनुसार, आपली वेबसाईट अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. कंपन्यांनी तक्रार अधिकाऱ्याच्या नियुक्तीसह इतर माहिती अपडेट करण्यास सुरुवात केली आहे.
सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या बड्या सोशल मीडिया कंपन्यांनी नवीन डिजीटल नियमांनुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे तपशील दिला आहे. परंतु ट्विटर मात्र अद्यापही या नियमांचं पालन करताना दिसत नाही.
नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार निवारण अधिकारी आणि त्यांचा पत्ता याबाबतची माहिती आपल्या वेबसाईट आणि अॅपवर द्यावी लागेल. तसंच तक्रार करण्याची पद्धतही सांगावी लागेल, जेणेकरुन युजर्स, पीडित व्यक्ती आपली तक्रार नोंदवू शकेल. तक्रार अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत तक्रार नोंदवल्याबाबतची माहिती द्यावी लागेल. तसंच तक्रार दाखल झाल्यापासून 15 दिवसांच्या आत त्या तक्रारी निकाली काढाव्या लागतील.