बालाजी सुरवसे: उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सौदणा येथे शुक्रवारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास विद्युत वाहक तारेचे शॉर्टसर्किटमुळे बावीस एकर ऊस व ठिबक,तुषार संच,पि व्ही सी पाईप जळून खाक झाले. आगीचा वेग इतका प्रचंड होता की ग्रामस्थांना ती आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. या आगीमध्ये बळीराम बपाजी पालकर,एकनाथ संदिपान गायकवाड,भैरू लक्ष्मण लकडे, ज्ञानोबा रघुनाथ लकडे,क्रांती शिवाजी लकडे, सुरेखा बाळासाहेब पालकर,लक्ष्मण गणेश पालकर, रामभाऊ गणेश पालकर, अशोक रामभाऊ लकडे, वासुदेव बिरजू लकडे, सोनबा बिरजू लकडे, गंगाधर रघुनाथ लकडे या शेतकर्यांच्या ऊसाचे व ईतर शेती उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.दरम्यान शेतकर्यांना शासन ठिबक व तुषार सिंचनासाठी ऐंशी टक्के अनुदान देते हे अनुदान एकदा घेतल्यानंतर सात वर्षे घेता येत नाही. अशा आकस्मिक आपत्तीत नुकसान झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना हे अनुदान शहानिशा करून मिळणे आवश्यक आहे यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तर सौदणा येथील शेतकऱ्यांचे उभा ऊस जळून अतोनात नुकसान झाल्याचे समजताच भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी शनिवारी दुपारी पहाणी करून शेतकऱ्यांचे सांत्वन केले व शासन दरबारी ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले व बिगर सभासदांच्या ऊसाची विल्हेवाट लावण्यासाठी लागलीच याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कौस्तुब दिवेगावकर व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी चर्चा केली.