श्रीलंकेत सध्या परिस्थीती दिवसेंदिवस गंभीर होत जातेय. देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक (Economic Crisis in Sri Lanka) झाली असून, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. अन्नासाठी लोकांना तासंतास रांगेत उभं राहावं लागतंय. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, अनेक भागांत लोक रस्त्यावर उतरले आहेत. यादरम्यान श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Sri Lanka PM Mahinda Rajpaksa) यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर आता श्रीलंकेच्या सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा देण्याचा सध्या कुठलाही विचार नाही असं काल पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता ‘श्रीलंका पोदुजना पेरामुना’ या सत्ताधारी पक्षाचे खासदार असलेल्या सागारा कारीयावासम यांनी पंतप्रधान राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं आहे. सरकार सक्षम आहे, आमच्याकडे संसदेत बहुमत आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजीनामा देणार नाहीत असं त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की, सध्या परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाला असून, त्यासाठी आम्हाला शाश्वत उपाय हवा आहे. भारताबद्दल बोलताना कारीयावासम म्हणाले की, भारत हा आमचा शेजारी राष्ट्र असून, भारताना नेहमीच आम्हाला मदत केली आहे. सध्याच्या परिस्थितीत देखील भारताकडून आम्हाला मदत होतेय. त्यामुळे आम्ही भारतावर अवलंबून आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.