भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जून महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल होणार आहे. या फायनलकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. मात्र त्याचबरोबर या फायनलवर कोरोनाचं देखील सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 सदस्यांसह इंग्लंडला जाण्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल नं परवानगी दिली आहे.
'आयसीसी बोर्डाने सदस्यांना सीनियर गटातील स्पर्धेसाठी सात अतिरिक्त खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ नेण्याची परवानगी दिली आहे. ज्या स्पर्धेसाठी आयसोलेशन आवश्यक आहे, त्या ठिकाणी सर्व टीम बायो-बबलमध्ये राहतील. भारतामध्ये या वर्षी टी20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.
'भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) आणि भारत सरकार यामध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे,' असंही आयसीसीनं सांगितलं आहे. महिला वन-डे सामन्यातील दोन नियमांना बदलण्याचा निर्णय देखील आयसीसीनं गुरुवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे.
आता नव्या नियमानुसार महिलांच्या वन-डे मॅचमधील पाच ओव्हर्सचा बॅटींग 'पॉवर प्ले' रद्द करण्यात आला आहे. तसंच सर्व बरोबरीत सुटलेल्या मॅचचा निर्णय हा सुपर ओव्हरमध्ये होईल. त्याचबरोबर बर्मिंगहॅममध्ये 2022 साली होणाऱ्या राष्ट्रकूल स्पर्धेतील महिलांच्या सामन्यांना आंतरराष्ट्रीय मॅचचा दर्जा देण्यात आला आहे.