ZIM vs IND First T20 Match : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरु झाली असून आज हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये पहिला सामना रंगत आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या तीन धाकड फलंदाजांनी पदार्पण केलं आहे. यामध्ये अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांच्या नावाचा समावेश आहे.
कर्णधार शुबमन गिलने सामना सुरु होण्याआधी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं की, अभिषेक शर्मा त्याच्यासोबत सलामीला फलंदाजी करणार आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत सलामीला फलंदाजी करण्यासाठी यशस्वी जैस्वाल पहिला सामना का खेळत नाही? असा सवाल तमाम क्रिकेटप्रेमींना पडला आहे.
यशस्वी जैस्वाल पहिला सामना का खेळत नाही?
भारतीय क्रिकेट संघाने यूएसए आणि वेस्टइंडिजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपचा किताब जिंकला आहे. १५ सदस्यीय भारतीय संघात यशस्वी जैस्वालचाही समावेश होता. परंतु, संपूर्ण टूर्नामेंटमध्ये जैस्वालला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण बीसीसीआयने आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात यशस्वी जैस्वालने उपस्थिती दर्शवली होती. जैस्वाल सर्व विजेत्या खेळाडूंसोबत ४ जुलैला भारतात पोहोचला. तसच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधला आणि संघाच्या विजयी मिरवणुकीतही त्याने सहभाग घेतला होता.
तत्पूर्वी, बीसीसीआयने एक प्रेस रिलीज जारी करून माहिती दिलीय की, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबेला विजयोत्सव साजरा करण्यासाठी पहिल्या दोन सामन्यांसाठी बाहेर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे. याच कारणामुळे यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे हे तिनही खेळाडू पहिल्या दोन सामन्यांसाठी बाहेर राहणार आहेत. हे खेळाडू शेवटच्या तीन सामन्यांमध्ये खेळणार आहेत.
पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारत आणि झिम्बाब्वेचा संघ
टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार
झिम्बाब्वे : सिकंदर रजा (कर्णधार), तदिवानाशे मारुमनी, इनोसेंट कैया, ब्रायन बेनेट, जॉनाथन कँपबेल, डायोन मायर्स, क्लाईव मदांडे, वेलिंगटन मसाकाद्जा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजारबानी, तेंडाई चटारा.