जगभरात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा उत्साह सुरु असताना, भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एस एस बापू नारायण यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे.
दोन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एस एस बापू नारायण यांचे निधन झालयाची घटना घडली. १९५६ ( मेलबर्न) आणि १९६० ( रोम) च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. एस एस बापू नारायण यांचे ठाणे येथील राहत्या घरी निधन झाले. १२ नोव्हेंबर १९३४ साली केरळमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी स्थानिक स्पर्धेत कॅल्टेक्स व टाटा एससी क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. १९६४साळी संतोष ट्रॉफी स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या संघाचे ते सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय माटुंगा इंडियन जिमखाना आणि माटुंगा अॅथलेटिक क्लबसाठीही ते खेळले होते. २०१३मध्ये मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशननं त्यांच्या योगदानाप्रती सत्कार केला होता.