भारतीय गोल्फपटू आदिती अशोक यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी आदिती ही भारताची पहिली महिला गोल्फपटू आहे. टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवण्याच्या प्रक्रियेला जुलै २०१८ पासून सुरुवात झाली होती आणि आदितीने सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. तीन वर्षांपूर्वी ती ऑलिम्पिक क्रमवारीत २८ व्या स्थानावर होती. मंगळवारी आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनने ६० खेळाडूंची यादी जाहीर केली, त्यात आदिती ४५ व्या स्थानावर होती. त्यामुळे ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.
मला दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद आहे. एका पेक्षा दोन कधीही चांगलेच नाही का! जगातील सर्वात मोठ्या स्तरावर मला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. केवळ मोजक्याच खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीत अशी संधी मिळते. मी आता टोकियोला जाण्यासाठी खूप उत्सुक आहे, असे आदिती ट्विट करून सांगितले आहे.