Suryakumar Yadav Praises Rishabh Pant: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका संपली असून टीम इंडियाने ३-० ने आघाडी घेत विजयी झेंडा फडकवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारताने टी-२० क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. तिसऱ्या सामन्यात भारत पराभवाच्या छायेखाली होता. परंतु, सूर्यकुमारच्या मास्टर प्लॅनमुळं भारतानं सामना विजयाच्या दिशेनं खेचला. भारताचा श्रीलंकेविरोधात दणदणीत विजय झाल्यानं संघातील खेळाडूंचं कर्णधार सूर्यकुमारने कौतुक केलं. भारताचा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत निस्वार्थी खेळाडू असल्याचं सूर्यकुमार म्हणाला.
सूर्यकुमार यादवने रिषभ पंतचं केलं कौतुक
पल्लेकेले मैदानात सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, कशाप्रकारे क्रिकेट खेळायचं आहे, हे आम्ही मालिकेच्या आधीच ठरवलं होतं. प्रशिक्षक गौतम गंभीरने पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. तसच वैयक्तिक स्वार्थ न ठेवता सर्वस्वी संघासाठी खेळावं, असं सांगण्यात आलं होतं.
त्यामुळेच पहिल्या सामन्यात रिषभ ४९ असताना तो सहजरित्या एक धाव काढू शकला असता, पण त्याने मोठा फटका मारला. दुसऱ्या सामन्यातही आम्ही आरामात खेळू शकलो असतो, पण आम्ही आमच्या टेम्पलेटला फॉलो केलं. सूर्यकुमार यादव रिषभ पंतला निस्वार्थी म्हणाला, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.