भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरोधात झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दणदणीत विजय मिळवला. भारताने ४-१ ने आघाडी घेत इग्लंडला पराभवाची धूळ चारली. भारताने धरमशाला येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात एक इनिंग आणि ६४ धावांनी इंग्लंडवर मात केली. टीम इंडियाच्या मालिका विजयानंतर रोहित शर्माने संघातील खेळाडूंवर स्तुतीसुमने उधळली.
कसोटी मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, जेव्हा तुम्ही कसोटी सामना जिंकता, तेव्हा सर्व गोष्टी योग्य वाटतात. सामन्यात अनेक गोष्टी आम्ही योग्यरितीने पार पाडल्या. अनेक स्टार खेळाडू भारतीय संघात सामील नव्हते. काही वेळेला खेळाडूंना बाहेर पडावं लागतं, हे आम्हाला माहित आहे. आता संघात असलेल्या खेळाडूंकडे अनुभवाची कमी आहे, पण खूप क्रिकेट खेळले आहेत. त्यांच्यात असलेलं कौशल्य बाहेर काढण्याची गरज असून खेळाबद्दल त्यांना समजावण्याची आवश्यकता आहे.
युवा खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करताना रोहित म्हणाला, जेव्हा दबाव आला तेव्हा या खेळाडूंनी चांगली प्रतिक्रिया दिली. यासाठी संपूर्ण संघाला श्रेय जातं. आम्ही धावा करण्याचा विचार करतो, पण कसोटी सामना जिंकण्यासाठी २० विकेट घेण्याची गरज असते. सर्व गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. कुलदीप यादवबाबत बोलताना रोहित म्हणाला, आपल्याला सर्वांना माहित आहे की, कुलदीपकडे खूप कौशल्य आहे. तो मॅच विनर बनू शकतो. दुखापतीनंतर त्याने पुनरागमन केलं. त्यानंतर त्याने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. त्याने फलंदाजीतही कमाल केली आहे.
प्लेयर ऑफ द सीरिज जिंकणाऱ्या यशस्वी जैस्वालबद्दल बोलताना रोहितने म्हटलं, त्याला खूप पुढे जायचं आहे. त्याला गोलंदाजांवर दबाव टाकून खेळायचा आहे. तो खूप पुढे आला आहे, त्याला समजेल की, त्याला काय करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी ही मालिका खूप चांगली ठरली. त्याला मोठी धावसंख्या करणे पसंत आहे.