मुंबईचं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलसाठी सज्ज झालंय. या सामन्यात यजमान टीम इंडियाचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. विश्वचषकाच्या साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलंय. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. याच न्यूझीलंडनं 2019 सालच्या विश्वचषकात टीम इंडियाला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळं त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय क्रिकेट संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे. टीम इंडियानं विश्वचषकाच्या साखळीत नऊपैकी नऊ सामने जिंकून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. न्यूझीलंडच्या खात्यात नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही संघ वानखेडेच्या मैदानात आज आमनेसामने येणार आहेत.
आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारतीय मैदानात दोन्ही संघ सर्वप्रथम १९८७ मध्ये आमनेसामने आले. भारतानं हा सामना १६ धावांनी जिंकला. यानंतर याच स्पर्धेत दोन्ही संघ पुन्हा एकदा भिडले. त्यात सुनिल गावस्करांनी शतक साजरं केलं. वेगवान गोलंदाज चेतन शर्मांनी हॅट्ट्रिक घेतली. हा सामना भारतानं जिंकला. त्यानंतर दोन्ही संघ वर्ल्डकपमध्ये यावेळी आमनेसामने उभे ठाकले. धर्मशालातील स्टेडियमवर झालेला सामना भारतानं ४ गडी राखून जिंकला. त्यामुळे भारताची कामगिरी न्यूझीलंडला घाम फोडणारी आहे.
नऊपैकी नऊ सामने जिंकणारा भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये पूर्ण फॉर्मात आहे. तर न्यूझीलंडच्या संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी शेवटच्या सामन्यापर्यंत वाट पाहावी लागली. दोन्ही संघ वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ९ वेळा आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडनं ५, तर भारतानं ४ वेळा विजय मिळवला आहे. आजचा सामना जिंकून न्यूझीलंडची बरोबरी करण्याची संधी भारताकडे आहे.