भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका रंगत आहेत. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेनं भारताचा १३ धावांनी पराभव केला होता. परंतु, आज हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा १०० धावांनी पराभव करून विजयाचा मोहोर उमटवली. भारताने झिम्बाब्वेला निर्धारित २० षटकांमध्ये २३५ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेचा संघ १३४ धावांवर सर्वबाद झाला.
भारतासाठी अभिषेक शर्मानं ४७ चेंडूत १०० धावांची वादळी खेळी केली. तसच ऋतुराज गायकवाडने ४७ चेंडूत नाबाद ७७ धावा कुटल्या. तर रिंकू सिंगने २२ चेंडूत नाबाद ४८ धावांची खेळी साकारली. झिम्बाब्वेसाठी वेस्ली मधिवरे (४३), ब्रायन बेनेट (२६) सर्वाधिक धावा केल्या. तर लुक जोंगवेनं ३३ धावांची खेळी केली. भारतासाठी गोलंदाज मुकेश कुमारने ३, आवेश खानने ३, रवी बिष्णोईने २, तर वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.
टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मासोबत शुबमन गिल पुन्दा एकदा सलामीला मैदानात उतरला होता. परंतु, या सामन्यात गिलला धावांचा सूर गवसला नाही. इनिंगच्या दुसऱ्या षटकात २ धावांवर असताना गिल बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी मोठी भागिदारी केली. दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या अभिषेक शर्माने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली. शर्माने ४७ चेंडूत १०० धावा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं शतक ठोकलं. यामध्ये ७ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे.
अभिषेक बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने ४७ चेंडूत ७७ धावा केल्या. यामध्ये ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. झिम्बाब्वेसाठी गोलंदाज ब्लेसिंग मुजराबानी आणि वेलिंग्टन मस्काद्जा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. टीम इंडियाने आपल्या इनिंगमध्ये २० चौकार आणि १४ षटकार ठोकून झिम्बाब्वे विरोधात सर्वात मोठा स्कोअर केला. याआधी ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेविरोधात २२९ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने झिम्बाब्वेविरोधात सर्वात जास्त १४ षटकार ठोकून दुसरं स्थान प्राप्त केलं आहे. याआधी अफगानिस्तानने झिम्बाब्वेविरोधात एका टी-२० सामन्यात १५ षटकार ठोकले होते.