भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनबाबत मोठे वक्तव्य केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे संघात सॅमसनचा समावेश केला जाईल, असे त्याने म्हटले आहे. सॅमसन टी-20 मालिकेचा भाग नाही. टी-२० विश्वचषकासाठीही त्याची निवड झाली नव्हती. लखनौमध्ये ६ ऑक्टोबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.
गांगुली तिरुवनंतपुरममध्ये म्हणाला, "संजू चांगला खेळत आहे. तो भारताकडून खेळला आहे, पण टी-२० विश्वचषक खेळला नाही. तो भारतीय संघाच्या योजनांमध्ये आहे. सॅमसन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे संघाचा भाग आहे. त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली आहे. तो कर्णधारही आहे.” सॅमसन वेस्ट इंडिज तसेच झिम्बाब्वे दौऱ्यात संघासोबत होता.
सॅमसनलाही उपकर्णधार बनवले जाऊ शकते. वनडे मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्याचबरोबर शिखर धवन संघाची कमान सांभाळू शकतो. वास्तविक, भारतीय संघाला पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. त्याआधी विश्वचषक संघात समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्याचबरोबर संजू सॅमसनसह देशांतर्गत क्रिकेटचे सुपरस्टार संघात पुनरागमन करू शकतात.
निवडकर्त्यांनी टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा खूप आधी केली होती, मात्र त्यानंतर त्यांनी वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला नाही. येत्या काही दिवसांत भारतीय निवड समिती एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणाही करू शकतात. सॅमसनने भारतासाठी सात एकदिवसीय आणि १६ टी-२० सामने खेळले आहेत.