नवी दिल्ली : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आज ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये पराभव झाला व सानियाचा शानदार ग्रँडस्लॅम प्रवास संपला. सानिया मिर्झाने यापूर्वीच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती. आज तिने शेवटची ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ खेळली. यानंतर सानियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. तिच्यासोबत रोहन बोपण्णा खेळत होता. अंतिम फेरीत भारतीय जोडीचा सामना ब्राझीलच्या लुईसा स्टेफनी आणि राफेल माटोस या जोडीशी होता. या सामन्यात सानिया-बोपण्णा जोडीला ६-७(२) २-६ ने पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर रोहन बोपण्णाने सानियाला तिच्या चमकदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत तिचे कौतुक केले. पण, यादरम्यान सानियाला आपले अश्रू अनावर झाले.
स्वतःला सांभाळत सानियाने सर्वांचे आभार मानले. ती म्हणाली की, माझ्या व्यावसायिक करिअरची सुरुवात 2005 मध्ये मेलबर्नमधून झाली. ग्रँडस्लॅम कारकिर्दीला अलविदा म्हणण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. मला माफी मागायची आहे.
जेव्हा मी सेरेना विल्यम्सविरुद्ध खेळली तेव्हा ती 18 वर्षांची होती. तर, 18 वर्षांपूर्वी कॅरोलिनाविरुद्ध खेळली होती. येथे खेळणे माझ्यासाठी नेहमीच सन्मानाची गोष्ट आहे. हे माझ्या घरासारखे आहे, असे सानिया मिर्झाने म्हंटले आहे.
दरम्यान, सानियाने मिश्र दुहेरीत 3 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सानियाच्या सहा ग्रँडस्लॅम विजेतेपदांपैकी तीन मिश्र दुहेरी आहेत. यात तिने महेश भूपती (2009 ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 फ्रेंच ओपन) आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस (2014 यूएस ओपन) सोबत जिंकले आहेत. सानियाने हिंगीस (विम्बल्डन 2015, यूएस ओपन 2015 आणि ऑस्ट्रेलियन ओपन 2016) सोबत तिची तिन्ही महिला दुहेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली. सानिया मिर्झाचा प्रवास येथेच संपला नसून पुढील महिन्यात दुबई येथे होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेत ती अंतिम स्पर्धा खेळणार आहे.