भारताचा फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) गेल्या काही काळापासून धावा काढण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागते आहे. २०१९नंतर कोहलीने (Virat Kohli) एकही शतक केलेले नाही आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतसुद्धा तो अपयशी ठरला. त्यामुळे कपिल देव आणि मायकल वॉन यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी कोहलीच्या (Virat Kohli) ट्वेन्टी-२० संघातील स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केलेत मात्र, भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कोहलीची पाठराखण केली आहे.
‘‘खेळाडूंची कामगिरी वर-खाली होत असते. मात्र, त्यामुळे खेळाडूची गुणवत्ता कमी होत नाही. एखाद्या खेळाडूविषयी विधान करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आम्ही खेळाडूतील गुणवत्तेला पाठिंबा दर्शवतो. ज्या खेळाडूने वर्षांनुवर्षे सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्याचे योगदान केवळ एक-दोन मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर विसरणे योग्य नाही. त्यामुळे बाहेरील व्यक्तींना जरी आपले मत मांडण्याचा अधिकार असला, तरी आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो,’’ असे रोहीत (Rohit Sharma) म्हणाला
यासोबतच रोहीत (Rohit Sharma) म्हणाला की, ‘‘कोहलीच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित करणारे ‘जाणकार’ कोण आहेत आणि त्यांना ‘जाणकार’ का म्हटले जाते, हे मला ठाऊक नाही. संघाबाहेरील लोक काय म्हणत आहेत, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. संघ निवडण्याची प्रक्रिया असते. आम्हाला खूप चर्चा करून संघबांधणी करावी लागते. आम्ही खेळाडूंची निवड करतो, त्यांना संधी देतो आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असतो. बाहेरील लोकांना हे माहिती नसते,’’ असे म्हणत रोहीतने कोहलीची पाठराखण केली.