Team India Players Felicitation In Maharashtra Legislative Assembly : आम्हाला इथे निमंत्रण दिल्याबद्दल सीएम साहेबांचे धन्यवाद. असा कार्यक्रम इकडे कधी झाला नाही, असं शिंदे साहेबांनी मला सांगितलं. आमच्यासाठी असा कार्यक्रम आयोजित केला, हे पाहून आम्हालाही भरपूर आनंद झाला. वर्ल्डकप भारतात आणायचं आमचं मोठं स्वप्न होतं. या वर्ल्डकपसाठी अकरा वर्ष आम्ही थांबलो होतो. २०१३ ला आम्ही शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकलो होतो. मी संघातील सर्व खेळाडूंचा खूप आभारी आहे. हे माझ्यामुळे, सूर्यकुमार, शिवम दुबे, जैस्वालमुळे झालं नाही, हे सर्व खेळाडूंमुळं झालं आहे. मला संघात जे खळाडू भेटले, ते जबरदस्त होते. सूर्याने आता सांगितलं की त्याच्या हातात चेंडू बसला. बरं झालं की तो चेंडू बसला. नाहीतर पुढे मी त्याला बसवलं असतं, असं मोठं विधान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं केलं. रोहित विधानभवनात सत्कार सोहळ्यात बोलत होता.
रोहित शर्मा, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे या खेळाडूंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी रोहित शर्मासह इतर खेळाडूंचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित होते.
टी-२० वर्ल्डकप २०२४ चा किताब जिंकल्यानंतर टीम इंडियाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनी भारतीय खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव केल्यानंतर मुंबईत वानखेडे स्टेडियम आणि मरिन ड्राईव्ह परिसरात टीम इंडियाच्या खेळाडूंनी विजयी परेड काढली. १७ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीम इंडियाला भरभरून शुभेच्छा देण्यासाठी शेकडो चाहत्यांनी वानखेडे स्टेडियम आणि मरिन ड्राईव्ह परिसरात गर्दी केली होती. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात टीम इंडियाचे खेळाडू मुंबईच्या रस्त्यावर चाहत्यांशी संवाद साधत होते.