IND Vs AFG : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माचे कर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे. विराट कोहलीही पुन्हा एकदा टीम इंडियाकडून टी-२० फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नाहीत. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड देखील या मालिकेत दिसणार नाहीत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे शेवटचे नोव्हेंबर २०२२ मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसले होते. या दोन खेळाडूंचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाल्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यावर्षी टी-20 विश्वचषकातही खेळताना दिसतील, असा अंदाज बांधला जाऊ शकतो.
तर, हार्दिक पांड्याने नोव्हेंबर 2022 पासून टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र दुखापतीमुळे तो संघाचा भाग असणार नाही. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या आता थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. इशान किशनच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली आहे. परंतु, केएल राहुल आणि श्रेयस अय्यरसा टी-20 संघात निवडकर्त्यांनी संधी दिली नाही.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत गोलंदाजीतही बदल झालेला पाहायला मिळणार आहे. युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना संधी मिळालेली नाही. फिरकीची जबाबदारी अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांच्याकडे आहे. वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार या युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला जात आहे.
असा आहे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्वोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान.