भारतीय संघाचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना नुकताच एक मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यांचा विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर WISDENS CRICKETERS OF THE YEAR या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा आतापर्यंत आपल्या बॅटिंगच्या जोरावर संघाला अनेक वेळा विजय मिळवून दिला आहे. तसेच जसप्रीत बुमराह यांनीसुद्धा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघाकडून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
या दोघांचा पाच जणांच्या यादीत समावेश आहे. या दोघांबरोबरच न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवॉय, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन आणि दक्षिण आफ्रिकेची महिला खेळाडू डॅनी वॅन नाईकेर्क यांचा देखील विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर 2022च्या यादीत समावेश करण्यात आला आहे.इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट याला जागतिक स्तरावरील लिडिंग क्रिकेटर (पुरूष) तर दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघातील खेळाडू लिझले ली हिला जागतिक स्तरावरील लिडिंग क्रिकेटर (महिला) हा पुरस्कार देण्यात आला. यांच्या जोडीला पाकिस्तानचा विकेट किपर बॅट्समन मोहम्मद रिझवानला लिडिंग टी 20 क्रिकेटर म्हणून गौरवण्यात आले आहे.
भारताच्या जसप्रीत बुमराहने इंग्लंड दौऱ्यात दमदार कामगिरी केली होती. त्याने लॉर्ड्स आणि ओव्हलवर झालेल्या कसोटी सामन्यात मॅच विनिंग स्पेल टाकला होता. ओव्हल कसोटीनंतर भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली होती. तर रोहित शर्माने सलामीला येत चार कसोटीत 52.57 च्या सरासरीने 368 धावा केल्या होत्या. रोहितने ओव्हलवर 127 धावांची सामन्याला कलाटणी देणारी खेळी केली होती. हे रोहितचे परदेशातील पहिले कसोटी शतक होते.