नवी दिल्ली : भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या जोडीने धावांचा पाऊस पाडला. दोन्ही फलंदाजांनी शतकी खेळी केली आणि 200 हून अधिक धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने ३ वर्षांनंतर वनडेत शतक झळकावले, हे त्याचे ३० वे शतक होते. भारताने न्युझीलंडला 386 धावांचे टार्गेट दिले आहे.
सामन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडविरुद्धच्या इंदूर वनडे सामन्यात शुभमन गिलने कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघासाठी सलामीची धुरा सांभाळली. सुरुवातीलाच रोहित-शुभमनच्या जोडीने फलंदाजीची कमाल दाखवत शतकी खेळी केली. परंतु, रोहित शर्मा फिरकी गोलंदाज मायकेल ब्रेसवेलच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात क्लीन बोल्ड झाला. त्याने 85 चेंडूत 101 धावांची खेळी केली.
तर, शुभमन गिलही शतकीय खेळीनंतर आउट झाला. यानंतर भारताची पडझड सुरुच राहिली. अशातच, हार्दिक पांड्याने अवघ्या 36 चेंडूंमध्ये तुफानी इनिंग खेळून भारताची धावसंख्या मोठी केली. इतर फलंदाज विराट कोहली 36, ईशान किशन 17 आणि सूर्यकुमार यादव 14 धावा करू शकला. शार्दुल ठाकूरनेही 25 धावांची खेळी केली. या सामन्यात भारताने 9 गडी गमावून 385 धावा केल्या आहेत.
दरम्यान, भारतीय संघाने आजचा सामना जिंकला तर न्यूझीलंडला मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप करेल. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना हैदराबादमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने रोमहर्षक पद्धतीने 12 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने 208 धावांची द्विशतकी खेळी खेळली. तर रायपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने 8 गडी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेपूर्वी भारतीय संघाने शेवटच्या १० पैकी फक्त एक वनडे जिंकली होती. यादरम्यान टीम इंडियाला 6 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. तर तीन सामने अनिर्णित राहिले.