क्रिकेटच्या मैदानात वुमन्स प्रिमियर लिग २०२४ चा थरार सुरु झाला असून दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या रंगतदार सामना झाला. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू जॉर्जिया वेअरहॅमनं दिल्ली कॅपिटल्सविरोधात झालेल्या सामन्यात हवेत उडी मारून अप्रतिम झेल पकडला. पण झेल पकडल्यांनतर जॉर्जियाचा तोल बाऊंड्री लाईनवर गेला अन् काही सेकंदातच तिनं चेंडू मैदानात फेकला. स्पायडरसारखी हवेत उडी मारुन जॉर्जियाने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आणि शेफालीने मारलेला षटकार वाचवला. सोशल मीडियावर तिच्या क्षेत्ररक्षणाच्या व्हिडीओची तुफान चर्चा असून क्रिडाविश्वात तिच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे.
नेटकऱ्यांनी जॉर्जियाच्या क्षेत्ररक्षणाची तुलना 'मिस्टर ३६०' एबी डी विलियर्सच्या क्षेत्ररक्षणाशी केली आहे. मैदानातील हा व्हिडीओ पाहून तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही. दिल्ली कॅपिटल्सचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर ११ व्या षटकात या झेलचा रोमांच पाहायला मिळाला. नादिन डी क्लार्कच्या भेदक गोलंदाजीवर शेफालीने डीप मिडविकेटवर मोठा फटका मारुन षटकार मारण्याचा प्रयत्न केला.
परंतु, मैदानात असलेल्या जॉर्जियाने स्पायडर सारखी उडी मारली अन् तो षटकार वाचवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांना एबी डिविलियर्सच्या आठवणींना उजाळा दिलाय. आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात २०१८ साली झालेल्या सामन्यात डिविलियर्सने अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं होतं.