प्रो कबड्डी लीग नवव्या हंगामाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रो कबड्डी लीग ७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार असून डिसेंबरपर्यंत असणार आहे. उदघाटन सोहळ्यानंतर क्रीडा प्रेमींना पहिल्या तीन दिवसांतच तिहेरी सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. पहिल्या ६६ सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये पहिल्या दोन दिवसातच सर्व १२ संघ मैदानावर उतरणार आहेत. प्रो कबड्डीच्या साखळी फेरीत शुक्रवार व शनिवारी तीन-तीन सामने रंगणार आहेत.
पहिल्याच दिवशी गतविजेता दबंग दिल्ली विरुद्ध यु मुंबा हि लढत ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दिवशी दुसरा सामना बंगळुरू बुल्स विरुद्ध तेलगू टायटन्स यांच्यात तर तिसरी लढत युपी योद्धाज विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात होणार आहे. लीग कमिशनर अनुपम गोस्वामी यांच्या हस्ते मशाल स्पोर्ट्स पेटवून या लीगचे उद्घाटन करण्यात आले. “कबड्डी या स्वदेशी खेळाला समकालीन इतर खेळांबरोबर आणि क्रीडा चाहत्यांच्या भावी पिढ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हा उपक्रम आपण दरवर्षी करत असतो. कबड्डी हा खेळ जगासमोर नेण्याच्या दृष्टीकोनातून विवो प्रो कबड्डी लीगचा प्रवास सुरू केला आहे.” असे लीग कमिशनर अनुपम गोस्वामी यांनी सांगितले.
बंगळुरू येथील श्री कांतिवीरा इंडोर स्टेडियम येथे ७ ऑक्टोबरपासून पहिले सत्र सुरु होणार असून पुण्यातील बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुलात २८ऑक्टोबरपासून स्पर्धेचा उत्तरार्ध पार पडणार आहे. लीगचा टप्पा बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे आयोजित केला जाईल.