PM Narendra Modi Congratulate Team India : टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या ऐतिहासिक विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी खेळाडूंशी फोनवरून संवाद साधत त्यांचं कौतुक केलं. इतकच नव्हे तर मोदींनी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबत आणि अप्रतिम कामगिरीवरही स्तुतीसुमने उधळली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगलेल्या फायनलच्या रंगतदार सामन्यात भारताने अखेर विजय मिळवला. विराट कोहली, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहनं या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली.
या टूर्नामेंटमध्ये धावांचा सूर न गवसलेल्या विराट कोहलीने फायनलच्या निर्णायक सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. विराटने ७६ धावांची अर्धशतकी खेळी केली. अशातच मोदींनी विराट कोहलीचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक केलं आहे. तसच शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पंड्याने भेदक गोलंदाजी केली. तर सूर्यकुमारनेही डेविड मिलरचा अप्रतिम झेल पकडून त्याला तंबूत पाठवलं. मोदींनी या दोन्ही खेळाडूंवरही कौतुकाची थाप मारली आहे. तसच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचंही मोदींनी विशेष अभिनंदन केलं आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी दुसऱ्यांदा जिंकली आहे. याआधी भारताने एम एस धोनीच्या नेतृत्वात २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकपवर विजयाची मोहोर उमटवली होती. टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे.
आम्हाला भारतीय संघाचा अभिमान आहे - मोदी
एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत मोदींनी म्हटलं की, चॅम्पियन्स! आपल्या संघाने शानदार अंदाजात टी-२० विश्वकप जिंकला आहे. आम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे. देशातील १४० कोटींहून अधिक लोकांना भारताच्या खेळाडूंच्या कामगिरीबाबत अभिमान आहे. खेळाडूंनी मैदानात कप जिंकला जिंकला पण त्यांनी देशातील प्रत्येक गावागावातील कोट्यवधी लोकांचं मन जिंकलं आहे. भारताने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये एकही सामना गमावला नाही. हे खूप मोठं यश आहे. कारण या टूर्नामेंटमध्ये अनेक संघांचा समावेश आहे.