भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पेनचा 2-1 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करत भारताला स्पेनविरुद्ध आघाडी मिळवून दिली, जी अखेरीस निर्णायक ठरली. टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले आणि आता सलग दुसऱ्यांदा पोडियमवर स्थान मिळवण्यात संघाला यश आले आहे.
भारताचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि संघाने या दिग्गज खेळाडूला निरोप दिला. भारताची भिंत म्हणून ओळखला जाणारा श्रीजेश टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या संघाचा भाग आहे. भारत आणि स्पेन यांच्यातील पहिला क्वार्टर गोलशून्य बरोबरीत राहिला. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनने गोल करत आघाडी घेतली. मात्र, दुसरा क्वार्टर संपण्याच्या काही वेळापूर्वी हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. हाफ टाइमपर्यंत दोन्ही संघांमधील सामना 2-2 असा बरोबरीत होता. यानंतर हरमनप्रीत सिंगने तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला आघाडी मिळवून दिली.
चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. हरमनप्रीतने भारताला आघाडी मिळवून दिली, तर श्रीजेशने गोलपोस्टवर शानदार सेव्ह करत स्पेनला बरोबरी करण्यापासून रोखले. 1968 आणि 1972 नंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चमकदार कामगिरीनंतर पीआर श्रीजेशने आंतरराष्ट्रीय हॉकीला अलविदा केला आहे.