पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला मोठा धक्का बसला आहे. वजन जास्त असल्याने तिला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले आहे.
मंगळवारी उपांत्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या विनेश फोगटला मोठा धक्का बसला आहे. तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. बुधवारी ही माहिती देण्यात आली. वजन जास्त असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने म्हटले आहे. असोसिएशनने सांगितले की, "विनेश फोगटला महिला कुस्तीच्या 50 किलो गटातून अपात्र ठरवण्यात आल्याने भारतीय संघाला दु:ख झाले आहे. संघाने रात्रभर सर्वोतोपरी प्रयत्न केले तरीही आज सकाळी तिचे वजन 50 किलोपेक्षा जास्त होते.
विनेशने उपांत्य फेरीत विजयाची नोंद केली होती. ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली महिला ठरली. पहिल्या फेरीपर्यंत विनेश 1-0 ने आघाडीवर होती. त्यानंतर शेवटच्या तीन मिनिटांत तिने क्यूबाच्या कुस्तीपटूवर दुहेरी आक्रमण करत चार गुणांची कमाई केली. ही आघाडी तिने शेवटपर्यंत कायम राखत अंतिम फेरीत धडक मारली. या ऑलिम्पिकमधील विनेशचा प्रवास विलक्षण राहिला आहे.