न्यूझीलंडचा संघ वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विजयी झाला आहे. अंतिम फेरीत जेतेपदासाठी न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत झाली होती. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसल्याचं दिसलं. कारण न्यूझीलंडने सावध पण सातत्यपूर्ण धावांची गती ठेवली.
दुबईच्या मैदानात 150 धावा भरपूर होतील असा अंदाज आधीच होता. त्यामुळे न्यूझीलंडने त्या पद्धतीने खेळी केली. सुरुवातीला जॉर्जियाच्या रुपाने धक्का बसल्यानंतर बॅकफूटला येईल असं वाटत होतं. पण सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांनी डाव सावरला. ही भागीदारी दक्षिण अफ्रिकेसाठी डोकेदुखी ठरली. त्यानंतर मधल्या फळीत ब्रूक हालिडेने चांगली फलंदाजी केली 28 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. न्यूझीलंडने 20 षटकात 5 गडी गमवून 158 धावा केल्या आणि विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. पण दक्षिण अफ्रिकेला हे आव्हान काही गाठता आलं नाही. दक्षिण अफ्रिकेला 20 षटकात 9 गडी गमवून 126 धावा करता आल्या आणि 32 धावांनी पराभव झाला. पुरुष संघाप्रमाणे महिला संघही चोकर्सचा शिक्का पुसण्यात अपयशी ठरले. सलग दुसऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने पराभवाचं तोंड पाहिलं आहे.
दक्षिण अफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत साजेशी कामगिरी करता आली नाही. 159 धावांचा पाठलाग करताना धावांची गती मंदावली होती. तसेच विकेट जाण्याची भीती स्पष्ट दिसत होती. त्याचा परिणाम धावगतीवर झाला आणि हळूहळू करत न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळवली. दरम्यान, न्यूझीलंडने साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमवला होता. पण जेतेपदाच्या शर्यतीत वरचढ ठरला आणि अखेर नवव्या पर्वात जेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरला. वुमन्स टी20 वर्ल्डकप जिंकणारा न्यूझीलंड हा चौथा संघ ठरला आहे.