नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी आज गंगा नदीत पदके विसर्जित करण्याचा निर्धार केला होता. यासाठी ते हरिद्वारला पोहोचले होते. मात्र, शेतकरी नेत्यांनी त्यांची समजूत काढली. व कुस्तीपटूंनी त्यांची पदके भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते नरेश टिकैत यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. यासोबतच नरेश टिकैत यांनी सरकारला ५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक या कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले होते. कुस्तीपटू पदक गंगेत फेकणार आहेत, कारण गंगा जितकी पवित्र मानली जाते तितकीच त्यांच्याकडे तितकीच पवित्रता आहे. काम केले व पदके मिळाली. पदके गंगेत सोडल्यानंतर कुस्तीपटू दिल्लीतील इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
यानंतर कुस्तीपटू हरिद्वारला पोहोचले होते. परंतु, येथे नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंची समजूत काढली आहे. राकेश टिकैत म्हणाले की, हा लैंगिक छळाचा विषय आहे. एका माणसाला वाचवायला संपूर्ण सरकार लागलं ही शरमेची बाब आहे. आम्ही खेळाडूंना मान खाली घालू देणार नाही. पैलवानांना परत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांना पदक ठेवायचे नसेल तर ते गंगेत वाहवण्याऐवजी थेट राष्ट्रपतींकडे सुपूर्द करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनावर मोर्चा काढला होता. यावर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते. तर, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरून कुस्तीपटूंचा तंबूही हटवला होता.