बार्बाडोस इथे झालेल्या T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 3 बाद 34 अशा अडचणीत सापडला होता. यानंतर विराट कोहलीने डाव सावरत अर्धशतकी खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. खोलीच्या या खेळीच्या बळावरच भारताला अंतिम सामन्यात आव्हानात्मक धावसंख्या उभारून विजय मिळवता आला. मात्र सामना संपल्यानंतर विराट कोहलीने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केलं. यामुळे T-20 विश्वचषकाचा आनंद साजरा करत असलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला.
या सामन्यातील 76 धावांच्या शानदार खेळीसाठी विराट कोहलीला सामनावीराचा किताब देण्यात आला. सामन्यानंतर तो म्हणाला, ''हा माझा शेवटचा T-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. हा माझा शेवटचा T-20 विश्वचषकही होता. हे सरप्राईज मी फायनलसाठी जपून ठेवले होते. युवा खेळाडूंना संधी देण्याची हीच वेळ आहे. रोहित शर्माने 9 T-20 विश्वचषक खेळले आहेत आणि हा माझा सहावा विश्वचषक होता. रोहित संघातील अशी व्यक्ती आहे जो या विजयासाठी सर्वात जास्त पात्र आहे".
विराट कोहलीच्या T-20 क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 125 सामन्यांच्या 117 डावांमध्ये 48.69 च्या सरासरीने 4188 धावा केल्या, तर यादरम्यान त्याने एक शतक आणि 38 अर्धशतके झळकावली. या फॉरमॅटमध्ये विराट कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 122 धावा. या काळात कोहलीने 31 वेळा नाबाद राहताना 369 चौकार आणि 124 षटकारही मारले.