कोलंबो : आशिया कप 2023 चा अंतिम सामना आज भारतीय आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा जलवा दिसला आहे. सिराजने अवघ्या 16 चेंडूत पाच विकेट घेतल्या. त्याने अवघ्या एका षटकात चार विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
श्रीलंकेच्या संघाचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेकडून प्रथम फलंदाजीसाठी पथुम निसांका आणि कुसल परेरा मैदानात उतरले. तर पहिले षटक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टाकले. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर बुमराहने कुसल परेराची विकेट घेतली. यानंतर श्रीलंकेने सावरण्याचा प्रयत्न केला आणि 3 षटकांत 1 गडी बाद 8 धावा केल्या. पण, चौथ्या षटकात सिराजने 6 चेंडूत 4 धावा देत 4 मोठे बळी घेतले आणि श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत पाठवला. यानंतर मोहम्मद सिराजने सहावे षटक टाकले. या षटकातही त्याने मोठी विकेट घेतली. सिराजने श्रीलंकेचा कर्णधार दासुन सनाकाला क्लीन बोल्ड केले. या झंझावाती गोलंदाजीमुळे सिराजने या सामन्यात आपल्या एकदिवसीय सामन्यात 50 बळी पूर्ण केले आहेत.
वनडेत ५० बळी घेणारा सिराज जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. सर्वात वेगवान 1002 चेंडूत त्याने ही कामगिरी केली. या विक्रमाच्या बाबतीत श्रीलंकेचा अजंथा मेंडिस अव्वल स्थानावर आहे. आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत त्याने पहिले 50 विकेट 847 चेंडूत घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात चार विकेट घेणारा सिराज हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच, वेगवान गोलंदाज सिराज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद पाच बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. सिराजने अवघ्या 16 चेंडूत आपले पाच विकेट पूर्ण केले.