दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित T20I मालिकेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने तीन सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन टी-20 सामन्यांसाठी मोहम्मद सिराजचा टी-20 संघात समावेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा T20 सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये आणि तिसरा T20 सामना 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये होणार आहे. दोन्ही सामने IST संध्याकाळी 7.00 वाजता सुरू होणार आहे.
जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. भारताने बुधवारी पहिला टी-२० सामना ८ गडी राखून जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
मोहम्मद सिराजने भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत फक्त 5 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 41.80 च्या सरासरीने आणि 10.45 च्या इकॉनॉमीने फक्त 5 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजने 27 फेब्रुवारी 2022 रोजी धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्ध टी-20 स्वरूपातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्या सामन्यात त्याने 4 षटकात 22 धावा देत 1 बळी घेतला होता.