आयपीएलच्या १५ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने इतिहास रचला आहे. मयंकने आरसीबीविरोधात झालेल्या सामन्यात ४ षटकात १४ धावा देत ३ विकेट घेतल्या. आयपीएलच्या डेब्यू सामन्यातही मयंकने पंजाब किंग्जविरोधात ३ विकेट घेण्याची कामगिरी केली होती. आता आयपीएल करिअरच्या दुसऱ्या सामन्यातही तो ३ विकेट घेण्यात यशस्वी झाला. आयपीएलच्या दोन्ही सामन्यात मयंकला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं.
एकाच खेळाडूला आयपीएल करिअरच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा किताबा मिळाल्याचं पहिल्यांदाच घडलं. पंजाब किंग्ज विरोधात झालेला सामना मयंकचा आयपीएल करिअरमधील पहिला सामना होता. या सामन्यातही त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच आरसीबीविरोधात झालेल्या सामन्यात मयंकने 156.7kmph च्या वेगानं चेंडू फेकून कमाल केली होती. त्याने स्वत:चाच विक्रम मोडला. पंजाब किंग्जच्या विरोधात झालेल्या सामन्यात मयंकने वेगवान गोलंदाजी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तर आरसीबीविरोधात झालेल्या सामन्यात मयंकने 156.7 kmph वेगानं गोलंदाजी करत अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
या सामन्यात लखनऊने आरसीबीचा २८ धावांनी पराभव करून दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. लखनऊचा संघ आता गुणतालिकेत चौथ्या नंबरवर पोहोचला आहे. या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी केली आणि ५ विकेट गमावून १८१ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबी संघाने १९.४ षटकात फक्त १५३ धावाच केल्या. त्यामुळे या टुर्नामेंटमध्ये आरसीबीचा तीनवेळा पराभव झाला. आरसीबी आता गुणतालिकेत ९ व्या स्थानावर पोहोचली आहे.