भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. भारतीय संघ एका महिन्याच्या विश्रांतीनंतर बांगलादेशविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तयारी करत आहे आणि संघाच्या खेळाडूंनी शुक्रवारी चेन्नई येथे सराव सत्रात भाग घेतला. यादरम्यान कोहलीने नेटमध्ये सुमारे 45 मिनिटे घालवली आणि भरपूर घाम गाळला.
कोहली या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत वैयक्तिक कारणांमुळे खेळला नव्हता आणि आता तो लाल चेंडूच्या फॉर्मेटमध्ये चमक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. बांगलादेशविरुद्धची पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवली जाणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि कोहलीसह संपूर्ण संघ एमए चिदंबरम स्टेडियमवर जमला होता. यावेळी नवे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल आणि सहायक प्रशिक्षक अभिषेक नायरही उपस्थित होते.
सराव सत्रादरम्यान, कोहलीने 45 मिनिटे घालवली आणि संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही सतत गोलंदाजी केली. एक महिन्यापेक्षा जास्त विश्रांतीनंतर खेळाडू मैदानात परततील. ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीरसोबतची ही पहिलीच कसोटी मालिका आहे.
ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सायकलचा भाग आहे. यानंतर भारताला न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच सामन्यांची बॉर्डर गावस्कर मालिका खेळायची आहे. WTC मध्ये भारत 68.52 टक्के गुणांसह आघाडीवर आहे, तर ऑस्ट्रेलिया 62.52 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश 45.83 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.