यंदाचे सत्र गाजवलेल्या दोन संघांमध्ये रविवारी म्हणजेच आज 26 एप्रिल 2024 आयपीएलच्या 17 व्या सत्राची अंतिम लढत रंगणार आहे. यावेळी, सांघिक खेळाच्या जोरावर खेळणारा कोलकाता संघ बाजी मारणार की आक्रमक खेळ करणारा हैदराबाद संघ जेतेपद उंचावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी, शनिवारी संध्याकाळी पावसाच्या सरी बरसल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर तिसऱ्यांदा आयपीएल अंतिम सामना होत असून 2012 नंतर पहिल्यांदाच या स्टेडियमवर आयपीएल अंतिम सामना रंगेल. तसेच, पहिल्यांदाच या स्टेडियमवर चेन्नई संघाविना अंतिम सामना होईल. याआधी चेन्नईने 2011 साली आपल्या घरच्या मैदानावर जेतेपद पटकावले होते, तर 2012 मध्ये त्यांना कोलकाताविरुद्धच उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मेंटॉर गौतम गंभीरची भूमिका कोलकातासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्याच नेतृत्वामध्ये कोलकाताने आपले दोन्ही जेतेपद पटकावली आहेत.
कोलकाताचा संघ सुनील नरेन, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांच्या उपस्थितीत अधिक समतोल दिसत आहे. कागदावर हा संघ अत्यंत भक्कम दिसत असला तरी, अखेरपर्यंत हार न मानणाऱ्या हैदराबादविरुद्ध त्यांना एखादी चूकही महागात पडू शकते.