ICC महिला वनडे विश्वचषक 2022 न्यूझीलंडमध्ये सुरू असून रविवारी (27 मार्च) ला 28 वा सामना पार पडला. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत या संघामध्ये झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव करत 3 विकेट्स राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करतांना भारताने 50 षटकांत 7 विकेट्स गमावत 274 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर म्हणून स्मृती मंधाना, शेफाली वर्मा आणि कर्णधार मिताली राज यांनी शानदार अर्धशतके केली. स्मृतीने फलंदाजीत 84 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकार मारत 71 धावा केल्या. तर शेफालीने 46 चेंडूत 8 चौकार मारत 53 धावांची शानदार खेळी केली. पहिल्या विकेटसाठी या दोघींमध्ये 91 धावांची भागीदारी झाली.
त्यानंतर कर्णधार मिताली व उपकर्णधार हरमनप्रित कौर या दोघांनी पुढचा मोर्चा सांभाळला. मितालीने 8 चौकाराच्या मदतीने 68 धावा पटकावल्या. तर हरमनप्रित 48 धावांवर बाद झाली. दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माईल आणि मसाबाटा क्लास यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
गोलंदाजांचे खराब प्रदर्शन
भारतीय फलंदाजांनी अतिशय उत्तम कामगिरी केली. परंतु त्यास गोलंदाज साथ देऊ शकले नाहीत. शेवटच्या क्षणी नो बॉल टाकून भारतीय संघाला 3 विकेट्सने हा सामना गमवावा लागला.
275 धावांचा पाठलाग करतांना दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लॉरा वालवार्डने सर्वाधिक 80 धावा पटकावल्या. तिने 79 चेंडूत 11 चौकार लगावत या धावा केल्या. सोबतच लॉरा गुडॉलने 49 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या चेंडूत हा सामना जिंकला.
हा सामना गमावल्यानंतर भारतीय महिला संघ विश्वचषकातून बाहेर पडला. भारतीय संघाने 7 पैकी 3 सामने जिंकून व 4 सामने गमावत पहिल्या चारमध्ये स्थान मिळवू न शकल्याने संघाला बाहेर पडावे लागले. मात्र याचा फायदा वेस्ट इंडिजच्या संघाला झाला असून त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.