कानपूरला पोहोचल्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी बुधवारी संघाच्या पहिल्या सराव सत्रादरम्यान कानपूरच्या खेळपट्टीची पाहणी केली. कर्णधार आणि प्रशिक्षक जोडीने खेळपट्टी पाहिली आणि बांगलादेशविरुद्ध 27 सप्टेंबरपासून होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळपट्टी कशा प्रकारची असू शकते हे जाणून घेतले.
भारतीय संघाने या दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून त्यांची नजर दुसरी कसोटी जिंकून बांगलादेशविरुद्ध क्लीन स्वीप करण्यावर असेल. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करत आघाडी घेतली.
कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये भारताचा विक्रम अधिक चांगला आहे. भारतीय संघाने ग्रीन पार्कमध्ये आतापर्यंत एकूण 23 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी सात सामने जिंकले आहेत आणि तीन पराभव पत्करले आहेत. या स्टेडिअमवर भारताचे 13 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने शेवटचा कसोटी सामना 2021 मध्ये कानपूरमध्ये खेळला होता. त्यावेळी संघाचा सामना न्यूझीलंडशी झाला जो अखेर बरोबरीत सुटला.