भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे.छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पेलेच्या ७७ गोलची बरोबरी केली आहे.
साफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत नेपाळविरुद्धच्या सामन्यात गोल झळकावल्यानंतर छेत्रीने ब्राझीलचा महान फुटबॉलपटून पेलेची बरोबरी केली आहे. सुनील छेत्रीने सामन्याच्या ८२ व्या मिनिटाला गोल झळकावला. फारूख चौधरीने दुसऱ्या सत्रात छेत्रीकडे चेंडू पास केला. छेत्रीने या संधीचं सोनं करत नेपाळी गोलकिपर किरण लिम्बुला चकवत गोल केला. या गोलसह भारताने नेपाळला १-० ने पराभूत केलं.
भारतीय संघासाठी छेत्रीचा १२३ वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वात जास्त गोल करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत छेत्री तिसऱ्या स्थानावर आहे. छेत्रीसोबत युएईच्या अली मबखौतच्या नावावरही ७७ गोल आहे. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटीनाचा मेसी छेत्रीच्या पुढे आहेत. रोनाल्डोच्या नावावर ११२ तर मेसीच्या नावावर ७९ गोल आहेत.