IND vs USA, T20 World Cup : टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये आज भारत आणि यूएसए यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो सुपर-८ मध्ये क्वालिफाय होईल. त्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील. तसच पाकिस्तानचा संघही या सामन्याकडे लक्ष ठेऊन असणार आहे. त्यांच्यासाठीही या सामन्याचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परंतु, पावसामुळं हा सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला फायदा आणि कोणत्या संघाचं नुकसान होईल? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाने खोडा घातला होता. त्यामुळे आजच्या भारत आणि यूएसएच्या सामन्यातही पाऊस पडणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. न्यूयॉर्कच्या हवामानाच्या रिपोर्टनुसार, १२ जूनला पाऊस पडण्याची २५ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये हवामान वेगानं बदलत असतं, त्यामुळे येथील हवामानाबाबत निश्चित अंदाज बांधता येत नाही. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची ३०-४० टक्के शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे पाऊस पडल्याने सामना उशिराने सुरु झाला होता.
पावसाने खोडा घातल्यास पाकिस्तानचं होणार सर्वात जास्त नुकसान
पावासामुळे सामना रद्द झाला तर, भारत आणि यूएसए दोन्ही संघ सुपर ८ साठी क्वालिफाय होतील आणि पाकिस्तानचा संघ टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर होईल. पावसामुळे सामना रद्द झाला तर, दोन्ही संघांना एक-एक गुण मिळेल आणि ते संघ ५ गुणांपर्यंत पोहचतील. तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ त्यांचे उर्वरीत दोन्ही सामने जिंकला तर चारच गुणांपर्यंत पोहचेल आणि टूर्नामेंटमधून बाहेर होईल. त्यामुळे आजचा सामना पूर्ण होऊन भारतीय संघाने यूएसए संघाला मोठ्या फरकाने पराभव करावा, अशी आशा पाकिस्तानच्या संघाला असेल. जर भारताचा यूएसएविरोधात एकतर्फी विजय झाला, तर पाकिस्तानसाठी सुपर-८ चे दरवाजे खुले होतील. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर पाकिस्तानच्या स्वप्नांवर पाणी फेरलं जाईल.