भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमध्ये सुरु झाला आहे. भारताच्या पहिल्या डाव 223 धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक (79) धावांची खेळी केली. तर पुजाराने 43 धावा केल्या आहेत.
भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने केपटाऊनमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताचं अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वी हे दोघे तंबूत परतले. डुआन ऑलिव्हियर ने राहुलला (१२) तर कगिसो रबाडाने एडन मार्करामला (१५) झेलबाद केले. लंचपर्यंत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. लंचनंतर भारताने शतक पूर्ण केले पण डाव गडबडला. चांगल्या लयीत खेळणाऱ्या पुजाराला वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने झेलबाद केले. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे रबाडाचा बळी ठरला. पुजाराने ७ चौकारांसह ४३ तर रहाणेने ९ धावा केल्या.
१६७ धावांत भारताने ५ फलंदाज बाद झाले. त्यानंतर भारताचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत राहिले. विराटने आक्रमक पवित्रा धारण करत झटपट धावा जोत संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. तो आज शतकाचा दुष्काळ संपवणार असे वाटत असताना बाद झाला. ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर विराटला रबाडाने तंबूत धाडले. विराटने २०१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि एक षटकारासह ७९ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर आफ्रिकेने भारताचा पहिला डाव लवकर संपुष्टात आणला. पहिल्या डावात भारताने ७७.३ षटकात सर्वबाद २२३ धावा केल्या. आफ्रिकेकडून रबाडाने ४, जानसेनने ३ बळी घेतले. लुंगी एनगिडी, डुआन ऑलिव्हियर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.
दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहेत. सेंच्युरियनची पहिली कसोटी भारताने तर जोहान्सबर्गची कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. केपटाऊनमध्ये जिंकणारा संघ मालिकाविजेता ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.