न्यूझीलंड विरोधातील एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता या दोन्ही संघात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आज या दोन्ही संघात याच मालिकेतील दुसरा निर्णायक सामना खेळवला गेला. आज खेळवल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात शेवटी भारताने विजय मिळवला. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. या विजयासोबतच मालिका जिंकण्याचे ध्येय देखील कायम ठेवले आहे. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आजची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अधिक चांगली होती, ज्याचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा फलंदाजांना केवळ 99 धावांतच तंबुत पाठवले. 100 धावांच्या माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघला शेवटपर्यंत लक्ष्य गाठण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. चौथ्या षटकांत शुभमन गिल 11 रन करुन बाद झाल्यावर भारताचा डाव फारच स्लो झाला. ईशान किशन लयीत दिसत होता, पण राहुल त्रिपाठी आणि त्याच्यात योग्य ताळमेळ न झाल्याने तो धावचीत झाला. 13 रन करुन राहुलही बाद झाला. सूर्यकुमार आणि सुंदर डाव सावरत होते, तोच पुन्हा चूकीच्या ताळमेळामुळे सुंदर 10 धावांवर धावचीत झाला. पण मग कॅप्टन हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांनी अनुक्रमे नाबाद 15 आणि नाबाद 26 धावा करत 19.5 षटकांत भारताला सामना जिंकवून दिला.