लोकशाही न्यूज नेटवर्क
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आजपासून चेन्नईत सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर सलामीवीर रोहित शर्माच्या १६२ धावांच्या जोरावर टीम इंडियाने सहा बाद ३०० धावा फटकारल्या. फिरकीपटू जॅक लीचच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट खेळताना रोहितचा मोईन अलीने सीमारेषेवर झेल घेतला. त्याने २३१ चेंडूत दिमाखदार १६१ धावा केल्या. यामध्ये १८ चौकारांसह दोन षटकारांचा समावेश आहे. घरच्या मैदानावर कमीत कमी १० कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सरासरीच्या बाबतीत रोहितने जगात दुसरं स्थान पटकावलं.
पहिला दिवस संपला तेव्हा भारत सहा बाद ३०० धावांवर होता. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले. मात्र, रोहितला अजिंक्य रहाणेने साथ दिल्यामुळे भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली. लीच आणि अली दोघांनी २-२ बळी टिपले.