कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला गेलेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अखेर ड्रॉ झाला आहे. अवघ्या एका विकेटमुळे भारताच्या हातून पराभव निसटला आहे. न्यूझीलंडने आज दिवसअखेर 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. परिणामी हा सामना अनिर्णित राहिला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 345 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी 296 धावांत रोखले. त्यानंतर भारताने दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंडने 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना वाचवण्यासाठी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी खूप मेहनत घेतली. प्रामुख्याने न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी चांगली झुंज दिली. रचिन रवींद्र आणि एजाज पटेल या दोघांनी 9 वी विकेट गेल्यानंतर पुढचे 52 चेंडू खेळून काढले. 52 चेंडूत 10 धावांची नाबाद भागीदारी रचत या दोघांनी सामना वाचवला. अखेर अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.