मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत भारताने न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. चौथ्या दिवसांचा खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या पाऊण तासाच्या खेळात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीचा फडशा पाडला. भारताच्या रविंद्रचंद्र अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी चार बळी टिपत किवींचा डाव अवघ्या 167 धावांत गुंडाळला.
भारताला विजयासाठी अवघ्या 5 बळींची आवश्यकता होती. भारताचा विजय न्यूझीलंडचे फलंदाज किती लांबवतात याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी चाहत्यांना विजयासाठी फार वेळ प्रतिक्षा करायला लावली नाही.
कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा फिरकीपटू जयंत यादव हा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. रचिन रविंद्रला १८ धावांवर बाद करत जयंत यादवने दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर जयंत यादवने न्यूझीलंडला एकाच षटकात दोन धक्के दिले. काइल जेमीसन आणि टीम साऊथी यांना त्याने भोपळा फोडण्याचीही संधी दिली नाही. एकाच षटकात दोघेही बाद झाले. त्यानंतर विल्यम सोमरव्हिलेला तंबूत माघारी धाडत किवींना 9 वा धक्का दिला. त्यानंतर रविचंद्र अश्विनने हेनरी निकोल्सला बाद करत भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारत – मयंक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड – विल यंग, टॉम लॅथम (कप्तान), डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडल (विकेटकीपर), रचिन रवींद्र, काइल जेमीसन, टिम साऊदी, विल सोमरविले, एजाज पटेल.