एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त विजय मिळवत टी-20 मालिका जिंकली आहे. भारताने इंग्लंडला 170 धावांचं आव्हान दिलं होत, मात्र भारताच्या तुफानी गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाज जास्त वेळ टिकु शकले नाहीत. त्यामुळे भारताने तब्बल 49 धावांनी हा सामना जिंकला. विशेष बाब म्हणजे एजबॅस्टनमध्येच टीम इंडियाला टेस्ट मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता आणि आता एजबॅस्टनमध्येच टी-20 सीरीज जिंकली आहे. (India Win by 40 runs Ind Vs Eng 2nd T20 Series)
गोलंदाजांची दमदार कामगिरी
टीम इंडियाकडून गोलंदाजीत सर्वात मोठा हिरो भुवनेश्वर कुमार ठरला. भुवनेश्वरने आजच्या सामन्यात तीन विकेट घेतल्या. त्यानं पुन्हा एकदा अप्रतिम स्विंग दाखवल्यामुळे दोन्ही सलामीवीर लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. भुवनेश्वरने आपल्या स्पेलमध्ये फक्त 15 धावा दिल्या.
रवींद्र जडेजाची तुफान फटकेबाजी
या सामन्यातही टीम इंडियाने आधी फलंदाजी करत जोरदार सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मासोबत ऋषभ पंत ओपनिंगला आला अन् सारेच आश्चर्यचकित झाले. दोघांमध्ये 49 धावांची भागीदारी झाली. यामध्ये एकट्या रोहित शर्माने 31 धावा काढल्या. पहिल्यांदा सलामीला आलेल्या पंतने 26 धावा केल्या. संघात पुनरागमन करताना विराट कोहलीला केवळ एक धाव करता आली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने 15, हार्दिक पंड्याने 12 धावा करून फ्लॉप गेम दाखवला. शेवटी रवींद्र जडेजाने 29 चेंडूत 46 धावा करत टीम इंडियाची लाज राखली. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 170 पर्यंत गेली.