मुंबई : पंचकुला (हरियाणा) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने पहिल्या कांस्य पदकाने खाते उघडले. गतका (सोटी-फरी सांघिक) या क्रीडा प्रकारात मुलींनी हे पदक पटकावले. पंजाबसोबत झालेल्या उपांत्य फेरीत पराभव झाला. महाराष्ट्राच्या मुलींनी अत्यंत उत्कृष्ट खेळ करत निकराची लढाई केली. (In the last, the girls won a bronze medal in the defeat of Panjab)
गतका हा पंजाबचा खेळ समजला जातो. तरीही महाराष्ट्राने त्यांना दिलेली टक्कर पाहून येथील क्रीडाप्रेमींनी महाराष्ट्राचे कौतुक केले. येथील ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये हा सामना रंगला. गतका हा क्रीडा प्रकार खेलो इंडियात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राचे पहिलेच पदक आहे.
राज्याचा पहिला सामना तामीळनाडूसोबत झाला. यात महाराष्ट्राने 74 तर तामीळनाडूचे अवघे 21 गुण होते. दुसरा सामना छत्तीसगडसोबत झाला. त्यात महाराष्ट्राने (117 विरूद्ध 48) एकतर्फी विजय मिळवला. उपांत्य फेरीची लढत पंजाबसोबत झाली. शुभांगी अंभुरे, सीमा खिस्ते, जान्हवी खिस्ते, नंदिनी पारधे या खेळाडूंनी पंजाबसोबत शर्तीची लढत दिली. पहिल्याच स्पर्धेत मिळवलेले हे यश नेत्रदीपक आहे.
ड्रायव्हरच्या मुलींचे यश
गतका संघातील चारही मुली मराठवाड्यातील आहेत. यात सीमा खिस्ते आणि जान्हवी खिस्ते (परभणी) या दोन्ही बहिणी आहेत. गरीब कुटुंबातील असून त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत धडक मारली. त्यांचे वडील ड्रायव्हर आहेत. बिकट आर्थिक परिस्थितीत या मुलींनी पांडुरंग अंभुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवले. क्रीडा विभागाने सराव शिबिर घेतल्याने खेळाडूंना यश मिळवता आल्याचे अंभुरे यांनी सांगितले.