आजपासून हॉकी विश्वचषकाला सुरुवात झाली. या विश्वचषकाचा पहिलाच सामना भारत विरुद्ध स्पेन यांच्यात झाला. या सामन्याकडे भारतातील सर्वांच हॉकी चाहत्यांचे लक्ष लागले होते. यंदा ही विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली जात असल्याने याबाबत सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. हा पहिला सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळवला गेला. याच पहिल्या सामन्यात भारताने विजयी सुरुवात केली आहे.
पहिल्या सामन्यात भारताने स्पेनचा 2-0 असा पराभव केला. भारताकडून या सामन्यात अमित रोहिदास आणि हार्दिक सिंगने गोल केले. भारताचा दुसरा सामना आता 15 जानेवारीला (रविवार) बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे. भारताने सामन्याला संथ सुरुवात केली. पहिली पाच मिनिटे स्पेनने टीम इंडियाला चांगलेच दणका दिला, पण जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतसा भारताने सामन्यात जागा मिळवण्यास सुरुवात केली. त्याचा फायदा टीम इंडियाला 11व्या मिनिटाला मिळाला. भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्याचे रुपांतर करता आले नाही. पुढच्याच मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर. यावर अमित रोहिदासने शानदार गोल करत टीम इंडियाला १-० ने आघाडीवर नेले.