आयपीएल २०२४ चा थरार पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तत्पूर्वी, गुजरात टायटन्स संघासाठी एक धक्कादायक बातमी समोर आलीय. आयपीएल २०२४ च्या लिलावात चर्चेत राहिलेला गुजरात टायटन्सचा स्टार खेळाडू रॉबिन मिंजचा अपघात झाला आहे. गुजरात टायटन्सने रॉबिनला आयपीएलच्या लिलावात ३.६० कोटी रुपयांत खरेदी केलं होतं.
रिपोर्टनुसार, युवा खेळाडू रॉबिन मिंज दुचाकीनं प्रवास करत होता. त्याचदरम्यान समोरुन येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराजवळ त्याचा तोल गेला आणि वाहनावरील ताबा सुटून अपघात झाला. एका वृत्तवाहिनीने रॉबिनचे वडील फ्रांसिस मिंज यांच्याशी संपर्क साधून या अपघाताबाबत खात्री केली. फ्रांसिस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, रॉबिनला खूप जखमी झाला नाही. त्याच्यावर उपचार सुरु आहे.
रिपोर्टनुसार, रॉबिनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. रॉबिन विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि तो एम एस धोनीचा चाहता आहे. झारखंडची राजधानी रांचीत राहणाऱ्या मिंजने आतापर्यंत रणजी ट्रॉफीमध्ये राज्याचं प्रतिनिधित्व केलं नाही, परंतु, झारखंडच्या १९ आणि २५ वर्षाखालील संघात त्याचा समावेश होता. दरम्यान, मिंजला अहमदाबादमध्ये टायटन्सच्या आयपीएल सत्रातील शिबिरात सामील व्हायचं आहे. परंतु, तो जखमी झाल्याने शिबिरात उशिराने दाखल होईल, असं बोललं जातं.